दारु पाजून व्यावसायिक मित्रांच्या दहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी
पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस महिलेस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दारु पाजून रियल इस्टेट व्यावसायिक मित्राच्या बॅगेतील सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि कॅश असा दहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपी महिलेस अंधेरी पोलिसांनी अटक केली. जयश्री सुरेश मोरे ऊर्फ श्वेता पवार असे या महिलेचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी शोभा महेंद्र गवई या महिलेस अटक केली होती. सध्या ती जामिनावर आहे. दोन्ही आरोपी महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
56 वर्षांचे तक्रारदार मूळचे उत्तर गोवाचे रहिवाशी असून त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. अनेक व्यावसायिक कामानिमित्त अनेकदा कामानिमित्त त्यांना मुंबईत यावे लागते. एप्रिल महिन्यांत ते कामानिमित्त मुंबईत आले होते. ओबेरॉय हाऊस येथे काम संपल्यानंतर ते अंधेरीतील त्यांच्या हॉटेलमध्ये गेले होते. रात्री ते त्यांच्या परिचित मैत्रिण शोभा गवईला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलाविले होते. मुंबईत आल्यानंतर ते शोभाला नेहमी भेटत होते. ठरल्याप्रमाणे 27 एप्रिलला शोभा ही तिची मैत्रिणीसोबत आली होती. तिथेच त्यांनी एकत्र मद्यप्राशन आणि जेवण केले होते. दारुच्या अमलाखाली असल्याने ते लवकर झोपले होते.
दुसर्या दिवशी त्यांना उशिराच जाग आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या बॅगेतून दहा तोळ्याचे विविध सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि वीस हजार रुपयांची कॅश असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी शोभाला विचारणा करण्यासाठी कॉल केला होता. मात्र तिने त्यांचा कॉल घेतला नाही. शोभासह तिच्या मैत्रिणीनेच त्यांच्या बॅगेतील सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि कॅश असा दहा लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यामुळे त्यांनी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघींविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोभासह तिच्या मैत्रिणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शोभा गवईला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत तिनेच जयश्री मोरे हिच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली होती. याच गुन्ह्यांत जयश्री ही फरार होती. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना जयश्री मोरे हिला पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या दोघींकडून अद्याप चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपी महिला सराईत गुन्हेगार असून त्या दोघीही नवी मुंबईतील वाशी परिसरात राहतात. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.