दुप्पट रक्कमेच्या आमिषाने व्यावसायिकाला अकरा लाखांना गंडा

तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दुप्पट रक्कमेच्या आमिषाने व्यावसायिकाला सुमारे अकरा लाखांना गंडा घालणार्‍या एका वॉण्टेड आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. राहुल रमेश माने असे या आरोपीचे नाव असून जून महिन्यांत अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच राहुल हा त्याची पत्नी वैशाली वाघमारेसह पळून गेला होता. अखेर तीन महिन्यानंतर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत त्याची पत्नी वैशालीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर राहुलला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

रविंद्र हनुमंत गोसावी हे वाळेश्‍वर येथील राजभवनमध्ये कर्मचार्‍यासाठी असलेल्या वसाहतीत राहतात. त्यांची आई लता गोसावी ही राजभवन येथे माळीचे काम करते तर त्यांचा गॅस सेफ्टी डिव्हाईस विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल २०२३ रोजी त्यांची वर्सस्टाईल अटायर सोल्यूशन प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक वैशाली वाघमारे आणि राहुल माने यांच्याशी ओळख झाली होती. या कंपनीचे अंधेरी एक कार्यालय असून याच कार्यालयात ते दोघेही काम करतात. यावेळी या दोघांनी त्यांना कंपनीच्या काही गुंतवणुक योजनेची माहिती दिली होती. त्यातील एका योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना दहा महिन्यांत दुप्पट रक्कम मिळेल असे सांगण्यात आले होते. या योजनेत अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून त्यांनीही गुंतवणुक करावी अशी विनंती या दोघांनी केली होती. योजनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी दहा महिन्यांत दामदुप्पट योजनेत अकरा लाख एकोणीस हजाराची गुंतवणुक केली होती. तीन महिन्यानंतर त्यांना ४५ हजार रुपये मिळाले होते, मात्र नंतर त्यांना कंपनीने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. याबाबत त्यांनी कंपनीत जाऊन विचारणा केली असता निकिता नावाच्या एका महिलेने कंपनीत काही प्रॉब्लेम झाला असून लवकरच त्यांची गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले.

मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी पैसे बँक खात्यात जमा केले नाही. चौकशीनंतर वैशाली आणि राहुल हे दोघेही कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे त्यांना समजले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वैशालीसह राहुल माने या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही शोधमोहीम सुर असतानाच तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या राहुल माने याला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. वैशाली ही अद्याप फरार असल्याने तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page