मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सभ्यासाची देवप्रिया निषांक या ३५ वर्षांच्या हॉटेल व्यावसायिकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. मद्यप्राशन करुन कार चालवून पळून जाताना रस्त्यावरील बॅरेक्टला धडक देऊन त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच कर्तव्य बजाविणार्या पोलीस शिपायाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ह प्रकार गुरुवारी रात्री उशिरा एक वाजता अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोखले ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जयवंत बाळकृष्ण मोरे हे अंधेरीतील एमआयडीसी, चकाला परिसरात राहत असून सध्या सहार वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री उशिरा ते पोलीस उपनिरीक्षक गवळी यांच्यासह इतर पोलिसांसोबत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोखले रोडवर नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. रात्री एक वाजता एक व्यक्ती भरवेगात कार घेऊन येत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांकडे दुर्लक्ष करुन कार वेगात पळविण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्याने तिथे असलेल्या बॅरेक्टसला जोरात धडक दिली होती. यावेळी त्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक तपासात त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथेच जयवंत मोरे यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची कूपर हॉस्पिटलमध्ये मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे. सभ्यासाची निषांक हा हॉटेल व्यावसायिक असून तो वरळीतील मोतीलाल सांगी मार्ग, र्ट विव हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.