एनडीपीएसच्या आरोपीच्या अटकाव करण्यास विरोध करुन धिंगाणा
सरकारी कामात अडथळा आणणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – एनडीपीएसच्या एका आरोपीला अटकाव करण्यास विरोध करुन पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नफिस सुफियान शेख, सिमरण अब्दुल कादर शेख, आमीर इम्रान बलोच आणि उमेर इम्रान बलोच अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर ३५ (३) नोटीस देऊन सोडून देण्यात आले. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना ३० जानेवारीला गुरुवारी सायंकाळी अंधेरीतील जे. पी रोड, साईबाबा कॉटेज, बोलीवाल हिल, बी. एच. श्रीकृष्णा एचटीएल परिसरात घडली. अंजली अरुण वाणी या वांद्रे येथील पोलीस अधिकारी वसाहतीत राहत असून मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची पोस्टिंग डी. एन नगर पोलीस ठाण्यात आहे. गेल्या वर्षी डी. एन नगर पोलीस ठाण्यात एक एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुनह्यांत सुफियान लम्बू या आरोपीस वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. सुफियान हा त्याच्या अंधेरीतील राहत्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता बोलीवाल हिल परिसरात गेले होते. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान नफिस, सिमरण, आमीर आणि उमेर या चौघांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन आरोपीचा शोध घेण्यास अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आमच्या घरात अशाच प्रकारे प्रवेश करु शकत नाही. तुमचा व्हिडीओ व्हायरल करुन त्यांची वर्दी उतरविण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण करुन पोलिसांनी शाब्दिक वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने तेथील वातावरण तंग झाले होते. त्यामुळे डी. एन नगर पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे रवाना झाले होते.
यावेळी या चौघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्ररकणी अंजली वाणी यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपीविरुद्ध पोलिसांशी वाद घालणे, धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या चौघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.