मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस उत्तरप्रदेशातून अंधेरी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. उबेद हैदरअली खान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशातील शहाजहापूर, पश्चिमी कसबा, कांटचा रहिवाशी आहे. उबेद हा चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अटकेने अंधेरी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार अँजेलो केजीटन डिसोझा अंधेरीतील चकाला, पारशीवाड्यातील सकिनाबाई चाळीत राहतात. 13 एप्रिल 2024 रोजी त्यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे आतिश वालावलकर, योगेश देवरस आणि क्लोरी अनिल डिसोझा यांच्या चार फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. त्यांच्या राहत्या घराचे कडीकोयंडा व कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला होता. चारही फ्लॅटमधून चोरट्याने सुमारे आठ लाखांचे सोन्याचे दागिने, कॅश आणि इतर मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच अँजेलो डिसोझा यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. रात्री उशिरा एकाच वेळेस चार फ्लॅटमध्ये झालेल्या या घरफोडीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिषठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद पवार, परकाळे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, शिंदे, लोंढे, पोलीस शिपाई म्हात्रे, मोरे, बाबर आणि महिला पोलीस शिपाई गोम्स यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. यावेळी परिसरात संशयास्पद फिरणारा उबेद खान असल्याचे उघडकीस आले होते. या घरफोडीनंतर तो पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध घेतला असता तो रेल्वेने बिहारच्या दरभंगा आणि नंतर वाराणसी येथे पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यांनतर या पथकाने तिथे त्याचा शोध घेतला होता, मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो पळून गेला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.
अखेर उबेदला उत्तरप्रदेशातून या पकिाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन ट्रॉन्झिंट घेऊन मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. उबेद हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात चार घरफोडी तर कुर्ला आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात दोन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून चोरीचे साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि वीस हजाराची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. त्याने अंधेरी पोलीस ठाण्यात दोन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.