रात्री वॉक करणार्या वयोवृद्धाची सोनसाखळीची चोरी
मुंब्रा येथून तीन आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मे 2025
मुंबई, – रात्री वॉक करणार्या एका वयोवृद्धाला चालताना धक्का मारुन त्यांच्या गळ्यातील दिड लाखांची दोन तोळ्याची सोनसाखळी चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना मुंब्रा येथून पोलिसांनी अटक केली. वसीम नूरमोहम्मद शेख, शहिद फरुख शेख आणि तौफिक रिजया अहमद इंद्रीसी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मुंब्रा येथील रहिवाशी आहेत. त्यांचा हा पहिलाच गुन्हा असून या गुन्ह्यांतील दिड लाखांची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शंकर जयराम जोशी हे वयोवृद्ध अंधेरीतील सहार रोड, कोलडोंगर परिसरात राहतात. 5 मेला ते जेवण झाल्यानंतर रात्री सव्वाअकरा वाजता ते विजयनगर सोसायटीसमोरील फुटपाथवर वॉक करत होते. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी चालताना त्यांना धक्का दिला. याबाबत शंकर जोशी यांनी जाब विचारला असता त्यांनी त्यांना चापट मारुन त्यांच्या गळ्यातील दिड लाखांची दोन तोळ्याची सोनसाखळी चोरी करुन अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पलायन केले होते. या प्रकारानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही तरुणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक परकाळे, सुपे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, शिंदे, सुरनर, कांबळे, कांबरी, गायकवाड, पोलीस शिपाई टरके, गवळी, लोंढे, म्हात्रे, मोरे, पाटील, नरबट, शिंदे, पिसाळ यांनी तपास सुरु केला होता. परिसरासह रेल्वे स्थानकातील सुमारे 250 ते 300 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.
या फुटेजवरुन तिन्ही आरोपी वाकोला जंक्शन येथून एका गाडीत बसल्याचेदिसून आले. त्यानंतर या कारचालकाची माहिती काढून पोलिसांनी कार बुक करणार्या व्यक्तीची माहिती काढली. या माहितीनंतर पोलिसांनी मुंब्रा येथून वसीम शेख, शहिद शेख आणि तौफिक इंद्रीसी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. चौकशीत ते तिघेही मुंब्रा येथे राहत असून त्यांचा हा पहिलाच गुन्हा आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.