बोलण्यात गुंतवून दागिने पळविणार्‍या आरोपीस अटक

आरोपीविरुद्ध 40 हून अधिक गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – बोलण्यात गुंतवून रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या एका आरोपीस नाशिक येथून अंधेरी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मुनावर ऊर्फ अन्वर अब्दुल हमीद शेख असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध 40 हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. डिसेंबर 2024 रोजी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अशाच प्रकारे सहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

61 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार नरेश कृष्णा गावड हे अंधेरी येथे त्यांच्या दोन मुलांसोबत राहतात. ते जसलोक हॉस्पिटलमध्ये इन्डोस्कोपी विभागात कामाला होते. 2022 साली ते निवृत्त झाले होते. तेव्हापासून ते घरी असतात. मंगळवारी 15 जुलैला ते घरापासून काहीच अंतरावर असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते त्यांच्या घरी जात होते. यावेळी त्यांना एक व्यक्ती भेटला. त्याने त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या परिचित असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगून त्यांना घरापर्यंत सोडतो असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांची गणेशमूर्ती लॉकेट असलेली सोन्याची चैन काढून ठेवली होती. यावेळी हातचलाखीने त्याने एक लाख साठ हजार रुपयांची 28 ग्रॅम वजनाची ती सोन्याची चैन घेऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गेल्या काही वर्षांत पोलीस असल्याची बतावणी करुनतसेच बोलण्यात गुंतवून वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील दागिने चोरी होण्याच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, शिंदे, पोलीस शिपाई लोंढे, म्हात्रे, पाटील, मोरे, पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. त्यातील एका फुटेजमध्ये मुनावर शेख हा दिसला होता.

मुनावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मुनावर कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अंधेरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने रेल्वे पोलिसांच्या मदतीने नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकातून मुनावर ताब्तया घेतले. त्याच्याकडून चोरीची सोन्याची चैन पोलिसांनी जप्त केली आहे. तपासात मुनावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या 40 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

डिसेंबर 2024 रोजी तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अशाच प्रकारे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यात अंधेरी, वाकोला, सायन, कस्तुरबा मार्ग, वसई, दादर रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक गुन्ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई सेंट्रल, वांद्रे कोर्टाने सहाहून अधिक अटक वॉरंट जारी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page