मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – कारवाईसाठी गेलेल्या साकिनाका पोलिसांच्या एका पथकावर आरोपीसह त्याच्या दोन सहकार्यांनी चाकूने प्राणघातक हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक परदेशी आणि पोलीस हवालदार शशिकांत पाटील यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी आकिब याकूब खान याला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अटकेची कारवाई टाळण्याने त्याने स्वतवरही चाकूने छातीवर आणि पोटावर वार करुन जखमी केले होते. दुसर्या गुन्ह्यांत त्याचा ताबा लवकरच साकिनाका पोलिसांना दिला जाणार आहे.
ही घटना बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता अंधेरीतील फारुकिया मशिदीसमोरील पत्रावाली चाळीत घडली. शशिकांत हरि पाटील हे कल्याणच्या चिकनघरगाव परिसरात राहत असून सध्या साकिनाका पोलीस ठाण्यात डिटेक्शनमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी आकिबविरुद्ध साकिनाका पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्हयांचा तपासकामी तसेच आकिबच्या अटकेसाठी साकिनाका पोलिसांचे एक विशेष पथक बुधवारी रात्री अंधेरी परिसरात आले होते. त्यात पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोलीस हवालदार खैरमोडे, पवार, करांडे आणि शशिकांत पाटील आदींचा समावेश होता. आकिबचा शोध सुरु असताना पोलीस पथकाला तो फारुकिया मशिदीजवळ दिसून आला. त्यानंतर त्याला पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता.
मात्र पोलिसांना पाहताच तो तेथून पळू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धमकी देत त्यांच्या दिशेने तिक्ष्ण हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला होता. हा वार पोलिसांनी चुकविण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांच्यासह पोलीस हवालदार शशिकांत पाटील यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी आकिबला इतर दोघांनी पळून जाण्यासाठी मदत केली होती. मात्र पोलिसांनी त्याला पळून जाण्यापूर्वीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्यासह इतरांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणून पोलिसांना दमदाटी करुन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती प्राप्त होताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अतिरिक्त पोलीस पथक तिथे दाखल होताच इतर दोघेही पळून गेले तर आकिबला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी शशिकांत पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकिबविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करुन पोलिसांना जिवे मारण्याची धमकी देणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान आकिबच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या उपनिरीक्षक परदेशी आणि हवालदार पाटी यांच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने फारुकिया मशिदीजवळील पत्रावाली चाळीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.