लग्नाच्या आमिषाने २० वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार
अश्लील फोटो व्हायरलची धमकी देणार्या प्रियकराविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका २० वर्षांच्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार करुन शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देताच त्यांच्यातील संबंधाचे अश्लील फोटो तिच्या कुटुंबियांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनिल श्रवण सोनकांबळे या प्रियकराविरुद्ध अंधेरी पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पिडीत तरुणी ही मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहत असून ती एका खाजगी अर्थपुरवठा करणार्या कंपनीत कामाला आहे. याच कंपनीत सुनिल हादेखील कामाला होता. कामादरम्यान त्यांची चांगली मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिनेही त्यास होकार दिला होता. जुलै महिन्यांत ते दोघेही अंधेरी येथे भेटले होते. तेथून ते एका हॉटेलमध्ये गेले. याच हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध करुनही तो तिला आपण लवकरच लग्न करु असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते. याच दरम्यान त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला होता, यावेळी त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर महिन्यांत तिला सुनिल हा दुसर्या तरुणीसोबत फिरत असल्याचे समजे होते. त्यामुळे तिने त्याला भेटायला बोलाविले होते, मात्र त्याने तिला भेटण्यास नकार दिला. काही दिवसांनी सुनिलने तिला फोन करुन भेटण्यास बोलाविले होते,
मात्र तिने त्याला भेटण्यास नकार दिला. यावेळी त्याने तिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीतर त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे फोटो तिच्या कुटुंबियांसह सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिला सुनिलला तिच्याशी लग्न करायचे नसून केवळ तिचा शारीरिक संबंधासाठी वापर करायचा आहे असे समजले होते. त्यामुळे तिने घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून सुनिल सोनकांबळे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी प्रियकराचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.