मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २४ वर्षांच्या आरोपी नातेवाईक तरुणाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने पिडीत मुलीला व्हॉटअपवर काही अश्लील फोटो पाठविण्यास प्रवृत्त करुन नंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
३४ वर्षांची तक्रारदार महिला ही खार परिसरात राहते. पिडीत ही तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे तर आरोपी तिचा नातेवाईक आहे. एकमेकांच्या परिचित असल्याने ही मुलगी त्यांच्या घरी जात होती. याच दरम्यान त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तो तिचा नातेवाईक असल्याने तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर ते दोघेही सोशल मिडीयासह मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात होते. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला व्हॉटअपवर तिचे अश्लील फोटो पाठविण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते. सोशल मिडीयावर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तिला घरी बोलावून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने तिचे मोबाईलवरुन पुन्हा काही फोटो काढले होते. जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
तो तिला सतत ब्लॅकमेल करुन धमकी देत होता. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने अंधेरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशाा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपी हा अंधेरी येथे राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.