अंधेरीतील हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दोन दलाल महिलांना अटक तर तीन तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – अंधेरीतील लोखंडवाला परिसरात सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन दलाल महिलांना पोलिसांनी अटक केली. अनामिका आणि प्रिती अशी या दोघींची नावे असून त्या दोघीही नवी मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघींनाही पुढील चौकशीसाठी ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही महिला पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून एक तरुणी ही नवी मुंबईतील एका नामांकित कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. झटपट पैशांसाठी त्या तिघीही या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्या होत्या. मेडीकलनंतर या तिघींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

अंधेरीतील लोखंडवाला, बँक रोडवर असलेल्या एका गाळ्यात बसून अनामिका ही महिला तिच्या इतर सहकारी महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असून ग्राहकांना तरुणीसह महिला पुरविण्याचे काम करते अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने अनामिका या महिलेस संपर्क साधून तिच्याकडे दोन तरुणींची मागणी केली होती. त्यापूर्वी तिला तरुणींचे काही फोटो व्हॉटअपवर पाठविण्याची विनंती केली होती. ठरल्याप्रमाणे तिने बोगस ग्राहकाला दोन तरुणींचे फोटो पाठवून प्रत्येक तरुणीमागे पंधरा हजार रुपयांच्या मागणी केली होती. याबाबत अनामिका आणि बोगस ग्राहकांमध्ये मोबाईलवरुन सविस्तर संभाषण झाले होते. ठरल्याप्रमाणे तिने त्यांना अंधेरीतील बँक रोड, लोखंडवाला परिसरात बोलाविले होते. मंगळवारी 26 ऑगस्टला हा बोगस ग्राहक तिथे गेला होता.

काही वेळानंतर तिथे अनामिका आणि प्रिती आले होते. त्यांच्यासोबत तीन तरुणी होत्या. यावेळी त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक संतोष काकडे, सहाय्यक फौजदार भिकाजी खडपकर, पोलीस हवालदार दत्तात्रय कोळी, विनय चौगुले, अविनाश झोडगे, शशिकांत निकम, बाबासाहेब शेळके, पोलीस शिपाई प्राजक्ता धुमाळ व अन्य पोलीस पथकाने तिथे कारवाई करुन अनामिका आणि प्रिती या दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघीही दलाल म्हणून काम करत होत्या.

नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या या दोघीही अंधेरीतील ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होत्या. विविध ग्राहकांना हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये तरुणीसह महिलांना पुरविण्याचे काम करत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या तिन्ही बळीत तरुणींची पोलिसांची सुटका केली. त्यापैकी 19 वर्षांची एक तरुणी नवी मुंबईतील एका कॉलेजमध्ये बीसीएच्या तिसर्‍या वर्गात शिकते. या सेक्स रॅकेटमध्ये ती गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत होती. तिच्यासाठी प्रिती ही ग्राहक आणून देत होती. त्यापैकी पाच हजार ती स्वतकडे ठेवून तिला दहा हजार रुपये देत होती. दुसर्‍या तरुणीने तिला अनिल सिंग यानेच या व्यवसायात आणले असून ती गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून त्याच्या सांगण्यावरुन विविध ग्राहकांसोबत जात असल्याचे सांगितले.

या गुन्ह्यांत अनिल सिंग याचे नाव समोर आल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. कारवाईनंतर या दोन्ही महिलांसह बळीत तिन्ही तरुणींना ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही महिलांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली तर इतर तिन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page