चोरीच्या दोन गुन्ह्यांत साडेपंधरा लाखांचे दागिने पळविले

घरातील नोकराविरुद्ध दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – चोरीच्या दोन गुन्ह्यांत घरातील नोकरांनी साडेपंधरा लाख रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सायन आणि अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायन आणि अंधेरी पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन नोकरांची चौकशी सुरु केली आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पद्मावती अरुल नाडर ही महिला धारावीतील शास्त्रीनगर परिसरात राहत असून तिचे पती मॅकेनिक म्हणून काम करतात. तीन महिन्यांपासून तिची बहिण वेनसिराणी जेयन नाडर ही सायन येथील रोड क्रमांक 31 मध्ये राहते. तिच्या मुलाला एमबीबीएसच्या कॉलेज प्रवेशासाठी कन्याकुमारी येथे जायचे होते, त्यासाठी ती तिच्या घरी गेली होती. काही वेळानंतर ते सर्वजण त्यांना सोडण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात गेले होते. यावेळी तिने तिच्या गळ्यातील 9 लाख 36 हजार रुपयांचे मंगळसूत्र तिच्या बहिणीच्या कपाटात ठेवले होते. घाईत असल्याने तिने कपाटाला लॉक लावले नाही.

घरी आल्यानंतर तिने कपाटातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे तिचे मंगळसूत्र नव्हते. तिने कपाटात सर्वत्र मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला मंगळसूत्र सापडले नाही. घरात तिच्या कुटुंबातील सदस्यासह तिची मोलकरीण नंदा सुरेश उभारे होती. मात्र ती काम करुन तिच्या घरी निघून गेली होती. तिनेच मंगळसूत्र चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन पद्मावती नाडरने तिच्याविरुद्ध सायन पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नंदा उभारेविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

दुसरी घटना अंधेरी परिसरात घडली. 64 वर्षांच्या अमृता आनंद सहस्त्रबुद्धे या तक्रारदार महिला अंधेरीतील विजयनगर सोसायटीमध्ये राहतात. त्या रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्या आहेत. 28 जुलैला तिने कपाटातील काही दागिने काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला कपाटातील सहा लाख बारा हजार रुपयांचे विविध दागिने कपाटात दिसले नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या राहत्या घरी त्याच्याच घरातील नोकराने टप्याटप्याने या दागिन्यांची चोरी केली होती. त्यांच्याकडे तीनजण कामाला होते, त्यापैकी कोणीतरी दागिने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घरातील तिन्ही नोकरांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page