व्यावसायिकाच्या घरी पंधरा लाखांचे दागिने घेऊन नोकराचे पलायन

चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – आत्याचे निधन झाल्याचे बतावणी करुन घरातील नोकराने एका व्यावसायिकाच्या घरातून सुमारे पंधरा लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंकितकुमार राऊत या नोकराविरुद्ध आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर शोध घेत आहेत.

ही घटना 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, रुणवाल एलीगंट अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या रुम क्रमांक सी/301 मध्ये प्रणव किशोर अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते व्यावसायिक आहे. त्यांचा स्वतचा कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी सात नोकर असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. त्यापैकी अंकितकुमार हा मूळचा बिहारच्या सितामढी, माणिक चौकचा रहिवाशी आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून तो त्यांच्याकडून कामाला असून त्याला गोरेगाव येथील एका एजंसीमार्फत त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते. 21 सप्टेंबरला त्यांच्या पत्नीची प्रकृती ठिक नसल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 22 सप्टेंबरला अंकितकुमार हा त्याच्या आत्याचे निधन झाल्याचे सांगून घरातून सुट्टी घेऊन निघून गेला होता. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्यांची पत्नी घरीच आराम करत होती.

1 ऑक्टोंबरला दसर्‍यानिमित्त त्यांना दिल्लीला जायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कपाटातील काही हिरेजडीत दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना कपाटात हिरेजडीत अंगठ्या, ब्रेसलेट, कानातले दोन जोड असा सुमारे पंधरा लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने सापडले नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण कपाटाची पाहणी केली होती, मात्र त्यांना कुठेच हिरेजडीत दागिने सापडले नाही. त्यामुळे घरातील सर्व नोकरांची चौकशी केली, मात्र कोणालाही दागिन्यांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सुट्टी घेऊन घरातून निघून गेलेल्या अंकितकुमारला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता.

याबाबत त्यांनी त्यांचा नोकर रोहित राऊतकडे चौकशी केली असता अंकितने दिलेले आधारकार्ड बोगस होते. त्याचे गाव दुसरेच असून तो घरातून निघताना त्याचे सर्व सामान घेऊन गेला होता. त्याने कपाटातील सुमारे पंधरा लाखांचे दागिने चोरी करुन पलायन केल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार आंबोली पोलिसांना सांगून आरोपी नोकर अंकितकुमार राऊतविरुद्ध चोरीची तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच गुन्ह्यांतील घरातील इतर नोकरासह गोरेगाव येथील एजन्सीच्या कर्मचार्‍यांची चौकशी होणार आहे. या चौकशीतून अंकितकुमारची जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page