डिजीटल फ्लेक्ससाठी लागणार्या इंक पाऊचसह कार्टेजची चोरी
पंधरा लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – प्रिटींग प्रेसमध्ये डिजीटल फ्लेक्स बनविण्यासाठी मशिनसाठी आवश्यक असलेल्या इंच पाऊचसह कार्टेजची एका नोकरानेच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच प्रिटींग प्रेसचा कर्मचारी असलेल्या सुरज सोनातन खारा याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. तपासात सुरजने गेल्या दोन वर्षांत सुमारे पंधरा लाख रुपयांच्या दिड हजार मिलि वजनाच्या 225 हून अधिक इंक पाऊचसह काही कार्टेजची चोरी करुन त्याची बाजारात स्वस्तात विक्री करुन मालकाची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची इंच पाऊच विक्री कंपनीच्या मॅनेजरच्या सतर्कमुळे पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिपीन प्रेमजी गाला हे अंधेरीतील डी. एन नगर, अदानी वेस्टर्न हाईट्समध्ये राहतात. त्यांचा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. अंधेरीतील कार्डिनल ग्रेसियस रेडवर त्यांचे पॅसिफिक डिजीटल नावाचे एक प्रिटींग प्रेस आहे. या प्रेसमधून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे डिजीटल फ्लेक्स बनवून दिले जाते. इको सॉलवट प्रिटींगसाठी अॅबसनस कंपनीचे चार प्रिंटर वापरले जात असून तीन मनिशसाठी सातशे इंक कार्टेज आणि एक मशिनसाठी दिड हजार मिलि इंक पाऊचचा वापर केला जातो. त्यासाठी कार्टेज आणि इंक एक आठवड्यापूर्वीच विलेपार्ले येथील नौकार इंटरप्रायजेस कंपनीकडून मागविले जाते.
17 डिसेंबरला नौकार इंटरप्रायजेसच्या मॅनेजरने ते वापरत असलेल्या कार्टेज आणि इंकची बाजारात विक्री होत असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी त्यांच्याकडील कार्टेज आणि इंकच्या स्टॉकची पाहणी केली होती. नोव्हेंबर 2023 रोजी त्यांच्या प्रिटींग प्रेसमध्ये अॅबसन्स कंपनीचे मशिन आणण्यात आले होते. तेव्हापासून किती पाऊचचा वापर झाल, किती पाऊचची ऑर्डर आली याची माहिती घेण्यात आली होती. त्यात नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत आतापर्यंत 219 पाऊचचा वापर झाला होता. मात्र त्यांच्याकडे ऑर्डरप्रमाणे 444 पाऊच आले होते. त्यापैकी मशिनमध्ये वापरण्यात येणारे 225 पाऊच दुकानात काम करणार्या नोकराने चोरी करुन त्याची बाजारात विक्री केल्याचे दिसून आले.
या घटनेनी बिपीन गाला यांनी गंभीर दखल घेत प्रिटींग प्रेसच्या सर्व सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरु केली होती. त्यात त्यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून काम करणारा सुरज खारा हा सायंकाळी प्रिटींग प्रेमधून बाहेर जाताना केबीनमधील कार्टेज आणि पाऊच एका पिशवीत टाकून जाताना दिसून आले. चौकशीदरम्यान त्याने या पाऊचसह काही कार्टेजची चोरी केल्याचे उघडकीस आले होते. याबाबत सुरज खारा याच्याकडे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत अँबसन्स कंपनीचे 14 लाख 85 हजार रुपयांचे प्रत्येकी दिड मिलि वजनाचे 225 इंक पाऊच चोरी केल्याची कबुली दिली होती, मात्र चोरीचे इंक पाऊच त्याने कोणालाही विक्री केली याबाबत काहीही माहिती दिली नाही.
या घटनेनंतर त्याला ताब्यात घेऊन अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून बिपीन गाला यांनी सुरज गालाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर ीत्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे इंक पाऊच लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.