मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंंबई, – मॉर्निंग वॉकसह रस्त्यावरुन जाणार्या पादचार्यांचे विशेषता महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पळून जाणार्या चारजणांच्या एका टोळीला दोन वेगवेगळ्या कारवाईत अंधेरी आणि टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मेहसाद जलील खान ऊर्फ सोनू, समीर मोहम्मद अन्सार अहमद शेख, मोहम्मद नसीब मुख्तार अहमद आणि हुसैन फयाजअली सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हुसैनविरुद्ध चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे तर इतर तिघांच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चौघांकडून चोरीचे सोनसाखळीसह गुन्ह्यांत वापरलेली कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शनिवारी 12 एप्रिलला सकाळी साडेसात वाजता तक्रारदार मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले होते. सांताक्रुज-चेंबूर लिंक रोड, स्टार जंक्शनजवळून जाताना एका कारमधून आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. गेल्या काही महिन्यांत मॉर्निंग वॉकदरम्यान महिलांच्या अंगावरील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांनी गंभीर दखल घेत टिळकनगर पोलिसांना आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी, दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार, आत्माराम राठोड, पोलीस हवालदार सोमनाथ पोमणे, सुनिल पाटील, अंबादास साप, सत्यवान साठेलकर, संजय आव्हाड, निलेश खरात, दशरथ राणे, पोलीस शिपाई सुनिल बिचुकले, समीर पिंजारी, ज्ञानेश्वर झिणे, भरत नागरगोजे, विनोद भोसले, मनोज कडव, विकास काटकर यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद मेहसाद, समीर मोहम्मद आणि मोहम्मद नसीब या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी अशाच प्रकारे वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले होते. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील सोनसाखळी आणि सुझुकी वॅगन कार असा 3 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनसाखळी चोरी करणारी ही सराईत टोळी असून ते मार्निंग वॉकसाठी येणार्या व्यक्तींना विशेषता महिलांना टार्गेट करत होते.
दुसर्या कारवाईत अंधेरी पोलिसांनी हुसैन सय्यद याला अटक केली. हुसैन हा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. जानेवारी महिन्यांत तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत जाताना हुसैनने त्यांच्या मानेवर थाप मारुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन बाईकवरुन पलायन केले होते. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हुसैनला तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली तर त्याच्या दुसर्या सहकार्याचा पोलीस शोध घेत आहेत.