मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील दोन वेगवेगळ्या अपघातात एका 63 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मरिअम्मा बालराज हरिजन आणि अमोल दिलीप मगर यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका वयोवृद्ध महिलेसह तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोन्ही चालकांना पोलिसांनी अटक केली. डंपरचालक अनुजकुमार शीतलाप्रसाद सरोज आणि टेम्पोचालक राजू मंटू यादव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
पहिला अपघात सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता अंधैरीतील महाकाली केव्हज रोड, महानगरपालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्रासमोरील चकाला सिग्नलकडून साठे चौकाकडे जाणार्या वाहिनीवर झाला. याच परिसरात विश्या मोगल अर्जुन ही महिला राहत असून ती कचरा वेचण्याचे काम करते. तिच्या पतीचे निधन झाले असून गेल्या पंधरा वर्षांपासून ती तिची आई मरिअम्मा हरिजन हिच्यासोबत राहते. तिचा भाऊ गोरेगाव व तिची विवाहीत मुलगी तामिळनाडू येथे राहतात. मरिअम्मा यादेखील कचरा वेचण्याचे काम करतात. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामासाठी निघून गेली होती. सकाळी पावणेबारा वाजता चकाला सिग्नलकडून साठे चौकाकडे जाणार्या वाहिनीवर कचरा वेचत रस्ता क्रॉस करत होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका डंपरने तिला जोरात धडक दिली होती. त्यात मरिअम्मा ही गंभीर जखमी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या मरिअम्मा हिला पोलिसांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर चालक डंपर तिथेच टाकून पळून गेला होता. त्यामुळे विश्या अर्जुन हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचे नाव अनुजकुमार शितलाप्रसाद सरोज असल्याचे उघडकीस आले. तो ठाण्यातील खारगाव, जयभीम नगरचा रहिवाशी आहे.
दुसरा अपघात सोमवारी सायंकाळी सव्वाचार अंधैरीतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या पवईकडे जाणार्या वाहिनीवर झाला. सरीता अमोल मगर ही महिला गोरेगाव येथे राहत असून मृत अमोल मगर हा तिचा पती आहे. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या व्ही वर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तो हाऊसकिपिंगचे काम करतो. दुपारी बारा वाजता अमोल हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. सायंकाळी तो पवईकडे जाणार्या वाहिनीवरुन जात होता. यावेळी त्याला भरवेगात जाणार्या एका टेम्पोने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या अमोलला पोलिसांनी कूपर हॉस्पिटलमघ्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती नंतर त्याची पत्नी सरीताला देण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी टेम्पोचालक राजू यादव याला पोलिसांनी अटक केली. राजू हा भिवंडतील रेहनान व्हिलेज, मिताली कॉम्प्लेक्सचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर अनुजकुमार सरोज आणि राजू यादव यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.