मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सिनेअभिनेत्री मलायका अरोरा हिचे सावत्र वडिल अनिल कुलदीप मेहता यांना नियमित डायरीमध्ये त्यांच्या डायटसह दिवसभरातील घडामोडीची नोंद करण्याची सवय होती, त्यामुळे त्यांची डायरी लवकरच वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेतली जाणार आहे. या डायरीने त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारणांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अनिल मेहता यांनी आत्महत्या केली की त्यांचा टेरेस फ्लॅटमधून पडून मृत्यू झाला याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिली. दोन्ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र ३६ तास उलटूनही त्यांच्या अपघाती किंवा आत्महत्येचे गूढ कायम आहे. गुरुवारी दिवसभरात वांद्रे पोलिसांनी कोणाचीही जबानी नोंदवून घेतली नव्हती. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेहता, अरोरा कुटुंबियासह बॉलीवूडचे अनेक कलाकार, मित्रमंडळी उपस्थित होते.
अनिल मेहता हे वांद्रे येथे राहत होते. बुधवारी सकाळी ते त्यांच्या टेरेस फ्लॅटमधून खाली पडले होते, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात अनिल मेहता यांची आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तरीही त्यांचा टेरेस फ्लॅटमधून पडून मृत्यू झाला आहे का याचाही संमातर तपास वांद्रे पोलिसांनी सुरु केला आहे. त्यांचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात त्यांच्या शरीरावर काही जखमा असल्याचे नमूद करण्यात आले होते. इमारतीवरुन पडल्यामुळे त्या जखमा झाल्याचे बोलले जाते. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह अरोरा आणि मेहता कुटुंबियांना सोपविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याच प्रकरणात अनिल यांची पत्नीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या घटनेमागे तिने कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली होती. त्यामुळे तिच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
आतापर्यंतच्या तपासात अनिल मेहता हे सिनेअभिनेत्री मलायका आणि अमृता अरोरा यांचे सावत्र पिता होते. मात्र या दोन्ही मुलींवर त्यांचा प्रचंड प्रेम होते. कौटुंबिक तसेच आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ते दोन्ही मुलींशी शेअर केले होते. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्या दोघीही त्यांना त्यांचे वडिल मानत होते, त्यांच्या आईसह अनिल मेहता यांची विशेष काळजी घेत होते. त्यामुळे या घटनेपूर्वी त्यांनी मलायका आणि अमृता यांना कॉल केला होता. मी आता थकलो आहे असे सांगून त्यांनी त्यांचा मोबाईल बंद केला होता. गुरुवारी दिवसभर अंत्यसंस्कारामध्ये मेहता आणि अरोरा कुटुंबिय व्यस्त असल्याने या कुटुंबांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली नव्हती. मात्र शुक्रवारपासून ही जबानी नोंदविण्याचे काम सुरु केले जाणार आहे.
प्राथमिक तपासात ही आत्महत्या असली तरी त्यांचा तोल गेला आणि ते पडले आहेत का याचाही पोलिसाकडून तपास सुरु आहे. अपार्टमेंटच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये ती इमारतीवरुन पडल्याचे दिसून आले आहे. अनिल मेहता यांची एक डायरी असून त्यात ते त्यांच्या डायटसह दैनदिन घडामोडीचा उल्लेख करत होते. या डायरीची माहिती प्राप्त होताच ती डायरी चौकशीसाठी ताब्यात घेतली जाणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या डायरीसह अनिल यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांच्यासह अरोरा आणि मेहता कुटुंबियांसह अपार्टमेंटचे स्थानिक रहिवाशी आणि सुरक्षारक्षकाचीही पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.