सिनेअभिनेत्री मलायका अरोराच्या सावत्र पित्याची आत्महत्या

अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्याच्या टेरेसरुन उडी घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असलेल्या अनिल कुलदीप मेहता ऊर्फ अनिल अरोरा या ६२ वर्षांच्या वयोवृद्धाने बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. अनिल मेहता हे सिनेअभिनेत्री मलायका आणि अमृता अरोरा यांचे सावत्र पिता असून त्यांनी त्यांच्या आईशी विवाह केला होता. त्यांच्याकडे वांद्रे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मेहतासह अरोरा कुटुंबियांची लवकरच पोलिसांकडून चौकशी केली जाणार असून या चौकशीतून या घटनेमागील कारणाचा खुलासा होणार आहे.

ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता वांद्रे येथील सहावा रोड, आयशा मनोर अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील टेरेस फ्लॅट क्रमांक ४५ मध्ये अनिल मेहता यांच्या पत्नीसोबत राहत होते. ते मर्चट नेव्हीमधून निवृत्त झाले होते. मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी तिच्या आईशी लग्न केले होते. त्यांचे मलायका आणि अमृता या दोन्ही सावत्र मुलींवर प्रचंड प्रेम होते. अनेकदा ते त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करत होते. या दोघींनाही अनिल मेहता हे त्यांचे सावत्र वडिल आहे असे कधीच वाटत नव्हते. अनिल यांना सकाळी वृत्तपत्र वाचण्याची आवड होती. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचत होते. यावेळी त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती. सकाळी दहा ते साडेदहा वाजता ते टेरेसजवळ आले. काही वेळानंतर त्यांची पत्नी तिथे आल्यानंतर तिला त्यांची चप्पल दिसली, मात्र ते कुठेच दिसले नाही. त्यामुळे तिने खाली पाहिले असता अनिल हे सोसायटीच्या आवारात पडल्याचे दिसून आले. याच दरम्यान मोठा आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने तिथे धाव घेतली होती. यावेळी त्याला अनिल मेहता तिथे पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने सोसायटीच्या इतर रहिवाशांन ही माहिती दिली.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून कळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत अनिल अरोरा यांना तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. प्राथमिक तपासात अनिल यांनी सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यांनी डिजीटल पद्धतीने कोणाला काही मॅसेज पाठविले आहे का याचा पोलीस तपास करत आहे. अनिल यांनी आत्महत्या केली असेल तर त्यामागील काय होते, इतक्या टोकाची भूमिका घेण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा तपास सुरु करुन त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणात कुटुंबातील सर्व सदस्यासह घरातील नोकर आणि स्थानिक रहिवाशांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीतून या घटनेमागील कारणाचा खुलासा होणार आहे. कूपर रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन होणार असून त्याचे व्हिडीओग्राफी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबियांसह मलायकाचा माजी पती आणि अभिनेता अरबाज खानसह त्याच्या कुटुंबियांनी, तिच्या मित्रांनी तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत. काही दिवसांपासून अनिल मेहता हे गुडघ्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यावर त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातून त्यांना काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच आयुष्यात घडणार्‍या घडामोडीबाबत ते मानसिक तणावात होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना कॉल केला होता. यावेळी त्यांनी दोघींनाही आपण आयुष्याला कंटाळून गेलो आहे असे सांगितले होते. यावेळी मयालकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिचा कॉल कट केला होता. त्यानंतर काही वेळानंतर हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे मलायका आणि अमतृा अरोरा या दोघींची पोलिसांकडून जबानी नोंदवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच अनिल मेहता हे मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनिल यांचा कॉल आला त्यावेळेस मलायका ही पुण्यात होती. तिला तिच्या आईकडून ही माहिती मिळताच ती पुण्यातून मुंबईत आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page