आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्य प्राण्याची तस्करीचा पर्दाफाश
45 प्राण्यासह प्रवाशाला अटक; काही प्राणी मृत आढळले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – थायलंड येथून आणलेल्या वन्य प्राण्यांचा तस्करीचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करुन त्याच्या सामानातून विविध प्रजातीचे 45 वन्य प्राणी जप्त केले आहेत. त्यातील काही प्राणी गुदमल्यामुळे मृत अवस्थेत आढळून आले. दरम्यान जिवंत प्राण्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याने सीमा शुल्क विभाग अधिक सतर्क झाले होते. संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु असताना या अधिकार्यांनी एका प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा थाई एअरवेजमधून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याकडील सामानाची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे विविध 45 प्राणी सापडले. त्यात रॅकून, काळे कोल्हे, हायरॅक्स आणि इगुआनाचा समावेश होता. काही प्राणी गुदरमल्यामुळे आणि त्यांची तस्करी करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
ते सर्व प्राणी जप्त केल्यानंतर संबंधित प्रवाशाला नंतर अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याची सध्या चौकशी सुरु असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे वन्य प्राण्याची तस्करी केली आहे. त्याला ते प्राणी कोणी दिले आणि तो प्राणी कोणाला व किती रुपयांना विकणार होता याचा तपास सुरु आहे. दरमन या वन्य प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्यात येणार आहे.