दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक
सहाजणांवर गुन्हे दाखल तर आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑगस्ट 2025
ठाणे, – घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिताफीने अटक केली. रोहित खेमजीभाई बनकार ऊर्फ परमार, प्रतिक कृष्णा भोईर, निरज ज्ञानेश्वर वेखंडे, समीर नारायण पालवी, भावेश आत्माराम गवाळे, अमर मोहन शिर्के आणि विजय दिनेश वारघडे अशी या सातजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, आठ जिवंत काडतुसे, दोन फायटर पंच, दोन सुती रस्सी,विविध कंपनीचे आठ मोबाईल, सिमकार्ड आदी मुद्देमाल जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी सांगितले. यातील सहाजणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर सर्वांना लोकल कोर्टाने शुक्रवार 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरारोडच्या सनशाईन हॉटेलजवळ काही रेकॉर्डवरील गुन्हेगार घातक शस्त्रांसह दरोड्याच्या उद्देशाने एकत्र जमणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांना संबंधित गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, विजयेंद्र आंबवडे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण, पोलीस हवालदार मुस्तकीन पठाण, राजवीर संधु, राजाराम काळे, सुनिल गोमासे, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार, पोलीस अंमलदार साकेत माघाडे, सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे सोमवारी 4 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता तिथे दोन संशयित कारमधून सातजण आले होते. या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र साध्या वेशातील पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी सातजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी पिस्तूल मॅगझीनसह, आठ जिवंत काडतुसे आणि इतर मुद्देमाल सापडला.
चौकशीत ते सर्वजण तिथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. त्यानंतर या सातजणांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, आर्म्स अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहित बनकार हा गुजरात येथे राहत असून त्याच्याविरुद्ध बच्छाव, समीरविरुद्ध शहापूर, निरजविरुद्ध भायखळा, प्रतिकविरुद्ध विरार, मांडवी, अमरविरुद्ध विरार, वाडा, गणेशपुरी, शहापूर, भावेशविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी सांगितले. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे हे करत आहेत.