मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मद्यप्राशन करण्यासाठी बारमध्ये आला नाही म्हणून आफ्ताब वजीर शेख या 21 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच मित्राने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अॅण्टॉप हिल परिसरात घडली. या हल्ल्यात आफ्ताब हा जखमी झाल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच रेकॉर्डवरील हल्लेखोर मित्र शाहिद रियाज अन्सारी याला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता अॅण्टॉप हिल येथील भगत शेख मिस्त्री दर्गा येथून ए ए इंटरप्रायजेस पानाच्या दुकानासमोर घडली. याच परिसरातील जय महाराष्ट्र नगरमध्ये आफ्ताब हा राहत असून सध्या तो कॉलेजमध्ये शिकतो. शाहिद हा त्याचा मित्र असून तो याच परिसरातील विक्रांत सोसायटीमध्ये राहतो. मंगळवारी रात्री नऊ वाजता शाहिदने आफ्ताबला ओमी पंजाब या बारमध्ये मद्यप्राशनासाठी बोलाविले होते. मात्र त्याने बारमध्ये येण्यस नकार दिला होता. त्याचा शाहिदला राग आला आणि त्याने त्याच्याकडील कोयत्याने त्याच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हाताने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
हल्ल्यानंतर शाहिद हा पळून गेला होता. जखमी झालेल्या आफ्ताबला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. ही माहिती मिळताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आफ्ताबच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शाहिद अन्सारीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शाहिदला काही तासांत पोलिसांनी अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएसचे तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला गुरुवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.