मिसिंग झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा मृतदेह कारमध्ये सापडला
मृतांमध्ये भावासह बहिणीचा समावेश; गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – दुपारी मिसिंग झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा रात्री उशिरा एका कारमध्ये सापडला. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये भोवासह बहिणीचा समावेश असून साजिद मोहब्बत शेख (७) आणि रिना मोहब्बत शेख (५) अशी या दोघांची नावे आहेत. कारमध्ये गुदमरुन या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागील खरे कारण समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मोहब्बत शेख हे ऍण्टॉप हिलचे रहिवाशी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे राहतात. त्यांना साजिद आणि रिना नावाचे दोन मुले आहे. बुधवारी ते दोघेही घराजवळ खेळत होते. मात्र काही वेळानंतर ते दोघेही अचानक गायब झाले होते. बराच वेळ होऊन साजिद आणि रिना हे घरी आले नाही म्हणून त्यांनी त्यांचा शोध घेतला. ज्या मुलासोबत ते दोघेही खेळत होते, त्यांच्याकडे विचारणा केली, मात्र या मुलांना त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मोहब्बतसह इतर स्थानिक रहिवाशांनी या दोन्ही मुलांचा शोध सुरु केला होता. मात्र ते कुठेही सापडले नाही. त्यामुळे मोहब्बत शेख यांनी ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात घाव घेऊन तिथे उपस्थित ड्युूटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांची मिसिंग तक्रार घेऊन त्यांचा शोध सुरु केला होता. दिवसाढवळ्या दोन अल्पवयीन मुले गायब झाल्याने ऍण्टॉप हिल पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक शिर्के, गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्यांना रात्री उशिरा काही अंतराजवळ पार्क केलेल्या एमएएच ०४ ए डब्ल्यू ८३३७ क्रमांकाच्या एका कारमध्ये साजिद आणि रिना हे दोघेही बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने कारमधून बाहेर काढून शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ऍण्टॉप हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या फुटेजमध्ये काही संशयास्पद दिसते का याची पाहणी केली, मात्र फुटेजमध्ये पोलिसांना काहीही संशयास्पद दिसून आले नाही. साजिद आणि रिना हे दोघेही खेळता खेळता कारजवळ आले आणि ते दोघेही कारमध्ये लपले होते. नंतर त्यांना कारचा दरवाजा उघडता येत आले नाही. त्यामुळे कारमध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतिक्षेत आहे. या अहवालानंतर या दोघांच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे हे तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मिसिंग झालेल्या दोन्ही मुलांचा कारमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.