20 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
दोन गुन्ह्यांची उकल करुन चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2025
मुंबई, – रेकी केल्यानंतर दिवसा तसेच रात्री बंद फ्लॅटमध्ये प्रवेश करुन घरफोडी करणार्या एका सराइ्रत आरोपीस अॅण्टॉप हिल पोलिीसांनी अटक केली. निखिल अनिल कांबळे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने सायन आणि व्ही. बी नगर पोलीस ठाण्यात झालेल्या इतर दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या दोन्ही गुन्ह्यांतील सर्व चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
21 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीत सायन-कोळीवाडा, सरदार नगर क्रमांक एकमध्ये राहणार्या तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या घरी घरफोडी झाली होती. एक लाख सतरा हजाराचा मुद्देमाल चोरी करुन चोरट्याने पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे, पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, प्रदीप पाटील, अंमलदार गणेश घुगे, रामेश्वर आंधळे, गोपाळ टेळे, विक्रम कुंभार, सागर गस्ते,सचिन विसपुते, सुरज किरतकर, अक्षय सजगाणे, दिनेश पाटील, समाधान ठाकूर, कुमार पाथरुड, सुधीर माने, निलेश माने, परमेश्वर राऊत, अनिल गाडगे यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्या अटकेने सायन आणि व्ही. बी नगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. निखीलविरुद्ध चेंबूर, नेहरुनगर, कुर्ला, दादर, गोवंडी, चुन्नाभट्टी, सायन, व्ही. बी नगर आणि गोवंडी पोलीस ठाण्यात 20 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले