पंधरा वर्षांच्या मुलगा, महिलेसह मित्रावर प्राणघातक हल्ला

ऍण्टॉपहिल-धारावीतील घटना; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन एका पंधरा वर्षांच्या मुलगा, महिला आणि तिच्या मित्रांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना धारावी आणि ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पंधरा वर्षांचा मुलगा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी गंभीर दुखापतीसह रॉबरी आणि ऍण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

निकिता यशवंत पाटील ही ३० वर्षांची महिला सायन-चुन्नाभट्टी परिसरात राहते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ती तिचा मित्र जयेश वाघमारे याच्यासोबत धारावीतील सागर हॉटेलसमोरील सायन रेल्वे ब्रिजवर उभी होती. यावेळी त्यांच्याकडे एक तरुण आला. त्याने जयेशकडे कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. मात्र त्याने त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने त्याचा मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. त्याने त्याचा पाठलाग करुन त्याला धारावीतील लक्ष्मीबाग परिसरात पकडले. यावेळी तिथे त्याचे तीन मित्र आले. या चौघांनी निकितासह जयेशला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान एकाने या दोघांच्या डोक्यात बांबूने जोरात फटका मारला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यानंतर चारही आरोपी जयेशचा मोबाईल घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर ते दोघेही सायन हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन ते दोघेही धारावी पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गंभीर दुखापतीसह रॉबरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसरी घटना ऍण्टॉप हिल परिसरात घडली. आयुष हा पंधरा वर्षांचा मुलगा ऍण्टॉप हिल येथील कोकरी आगार परिसरात राहतो. प्रतिक आणि साईनाथ हे दोन्ही अल्पवयीन मुले त्याच्या परिचित असून ते एकमेकाच्या परिचित आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजता आयुष हा ऍण्टॉप हिल येथील सेक्टर सातच्या गार्डन गेटसमोर होता. यावेळी तिथे प्रतिक आणि साईनाथ आले आणि त्यांनी त्याला मोठा क्यू बोला असे बोलून त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात या दोघांनी त्याच्याकडील चाकूने आयुषवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या खांद्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या आयुषला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आयुषची जबानी नोंदवून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page