मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून आकाश गणेश स्वामी या मित्रावर गोळीबार करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस गजाआड करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. विवेक देवराज चेट्टीयार असे या २६ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि एक रिकामी पुंगळी हस्तगत केली आहे. आगामी काळात विवेकला त्याच्या इतर दोन मित्रांची गोळ्या झाडून हत्या करायची होती, मात्र त्याच्या अटकेमुळे त्याची योजना फसली गेली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ऍण्टॉप हिल पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
ऍण्टॉप हिल येथील नाईकनगर, कृष्णा हॉटेलजवळील नवतरुण परिसरात आकाश हा त्याच्या कुटुंबियासोबत राहतो. विवेक हा त्याचा मित्र असून ते दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये आर्थिक वाद सुरु होता. हा वाद विकोपास गेला होता. त्यातून शनिवारी ६ एप्रिलला विवेक हा आकाशच्या घरी आला आणि त्याने त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यात आकाशच्या पोटात एक गोळी लागली होती. गोळीबारानंतर विवेक तेथून पळून गेला. जखमी झालेल्या आकाशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आकाशची आई वासंती कदम हिच्या तक्रारीवरुन ऍण्टॉप हिल पोलिसांनी विवेकविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. या गोळीबाराची घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ऍण्टॉप हिल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पळून गेलेल्या विवेकच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच विवेक हा डोबिवली परिसरात लपला असल्याची माहिती युनिट चारच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, पोलीस निरीक्षक अजीत गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, अजय बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक शामसुंदर भिसे, भावे, सहाय्यक फौजदार वशिष्ठ कोंकणे, शेडगे, पोलीस हवालदार शरद शिंदे, निर्भवणे, संजय तुपे, देवार्डे, पोलीस शिपाई संजय गायकवाड, प्रमोद पाटील, शुभम सावंत, सय्यद, पोलीस शिपाई चालक प्रसाद गरवड, चव्हाण यांनी डोबिवली परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी पहाटे तिथे विवेक आला असता त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि एक रिकामी पुंगळी सापडली.
चौकशीत त्यानेच या पिस्तूलमधून आकाशवर गोळीबार केल्याचे सांगितले. विवेक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे अशा बाराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो जेलमध्ये होता. कोरोना कालावधीत त्याला अभिवचन रजेवर सोडून देण्यात आले होते. मात्र तो पुन्हा जेलमध्ये गेला नव्हता. त्याच्याविरुद्ध विविध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट बजाविले आहेत. आरोपीची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता विवेकचे आकाश व इतर दोघांसोबत एक आर्थिक व्यवहार झाला होता. काही दिवसांनी याच व्यवहारातून त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून त्याने आकाशवर गोळीबार केला होता. आकाशवर गोळीबार केल्यानंतर विवेकला त्याच्या इतर दोन मित्रांची हत्या करायची होती. या दोघांच्या हत्येची योजना त्याने बनविली होती. त्यासाठी त्याने ते पिस्तूल आणले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या सतर्कमुळे या दोघांचा जीव वाचला आहे. अटक केलेल्या विवेकला नंतर ऍण्टॉप हिल पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.