अनैतिक संबंधातून पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला गेम
हत्येनंतर पळून गेलेल्या पत्नीसह प्रियकराला चार तासांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – अनैतिक संबंधाला पतीची मोठी अडसर होती, त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम करण्याची योजना बनविली आणि ठरल्याप्रमाणे तिने प्रियकराच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री पतीला बेदम मारहाण तसेच तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन पतीची हत्या केली. हत्येनंतर पळून गेलेल्या पत्नीसह प्रियकराला अवघ्या चार तासांत अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक करुन या हत्येचा पर्दाफाश केला. सुमय्या इस्माईल शेख आणि सकलाईन गोलम किब्रिया शेख अशी या दोघांची नावे असून या दोघांनी इस्माईल अली शेख याची हत्या केल्याची कबुली दिली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
ही घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता अॅण्टॉप हिल येथील बंगालीपुरा, राजीव गांधीनगर झोपडपट्टी परिसरात घडली. यातील तक्रारदार निजाम अख्तर शेख हा याच परिसरात राहत असून त्याच्या पत्नीची सुमय्या ही सख्खी बहिण आहे. ती तिच्या पतीसोबत राजीव गांधीनगर झोपडपट्टीत राहते. ते सर्वजण एकाच गावचे रहिवाशी असून मुंबई शहरात जरीकाम करतात. सुमय्याचा इस्माईलसोबत दुसरा विवाह असून तिला एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. तो मुलगा तिच्या आईकडे राहतो. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुमय्याचे इस्माईलसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तीन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर या दोघांनी विवाह केला होता.
इस्माईलसोबत प्रेमविवाह झाल्यानंतरही सुमय्याच्या स्वभावात फरक नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तिचे सकलाईन या तरुणासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. अनेकदा इस्माईल कामासाठी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी येत होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून इस्माईलला समजली होती. त्यामुळे सुमय्याला त्याच्यासह तिच्या बहिणीने समजाविले होते. तरीही त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरु होते. त्यातून त्यांच्यात नेहमी खटके उडू लागले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला इस्माईल अडसर होता. त्यामुळे सुमय्याने सकलाईनच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढायचा ठरविले होते.
सोमवारी रात्री याच संबंधातून इस्माईल आणि सुमय्या यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर तिथे सकलाईन आला होता. यावेळी या दोघांनी इस्माईलला बेदम मारहाण केली आणि चाकूने त्याच्या गळ्यावर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. सकाळी हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन इस्माईला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गळ्यावर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी इस्माईलचा नातेवाईक निजाम अख्तर शेख याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून या अनैतिक संबंधाचा पर्दाफाश झाला होता. याच प्रेमसंबंधातून सुमय्याने सकलाईनच्या मदतीने इस्माईलची हत्या केली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर त्याची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमेहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक समीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, शिवाजी मदने, प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी इंगले, पोलीस हवालदार घुगे, पाथरुट, पोलीस शिपाई विसपुते, माने, गाडगे, सजगणे, महिला पोलीस शिपाई त्रिपुटे, जाधव, जाधव, पोलीस हवालदार ठोके यांनी तपास सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मिरा दातार परिसरातून दोन्ही आरोपींना काही तासांत अटक केली. चौकशीत त्यांनी प्रेमसंबंधाला अडसर असल्याने इस्माईलची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.