मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – मारामारीसह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यांत गेल्या पंधरा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. अभिषेक ऊर्फ सनी प्रकाश दारोले असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच सनी हा पळून गेला होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
44 वर्षांचा सनी दरोले हा सायन-कोळीवाडा परिसरात राहतो. 2010 साली त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्याविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलीसठाण्यात 324, 504, 506 (2), 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याच्या सहकार्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या पंधरा वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त रागासुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, समीर कांबळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरफात सिद्धीकी, पोलीस हवालदार गोरख सानप, शिवाजी दहिफळे, अनिल राठोड यांनी नव्याने सनीचा शोध सुरु केला होता. यावेळी तो कर्जत येथे वास्तव्यास असल्याची पोलिसांना मिळाली होती. य माहितीनंतर पोलिसांनी तिथे तीन ते चार दिवस पाळत ठेवून सनी दारोले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.