गोड बोलून फसवणुक करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
महिलेसह दोघांना अटक तर दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – नोटांचे बंडल देऊन गोड बोलून सोन्याचे दागिने चोरी करुन पळून जाणार्या एका आंतरराज्य टोळीचा अॅण्टॉप हिल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रविणकुमार जगदीश यादव आणि मनी ऊर्फ निनि पवन बावरिया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही दिल्लीतील रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेने मुंबईतील दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह दिल्लीत अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आफरीन हकीम शेख ही 47 वर्षांची महिला अॅण्टॉप हिल यैथील शीव-कोळीवाडा, वडाळा टीटी येथील ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात राहते. 19 जुलै 2025 रोजी ती जीटीबी मनोरेल स्टेनजवळील मरिअम्मा मंदिराजवळून जात होती. यावेळी एका महिलेसह तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने तिच्याशी गोड बोलून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे नोटांचे बंडल देण्याचा बहाणा करुन त्यांनी तिच्याकडील 1 लाख 37 लाख रुपयांचे 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने अॅण्टॉप हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या इतर काही गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे त्याची पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश अॅण्टॉप हिल पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन संबंधित आरोपी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, महिला पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी इंगळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघ, पोलीस हवालदार घुगे, टेळे, ठोके, पोलीस शिपाई आमदे, किरतकर, सजगणे, विसपुते, खोत, महिला पोलीस शिपाई थोरात, डफळे आदीचे एक पथक दिल्लीत पाठविण्यात आले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रविणकुमार यादव आणि मनी बावरिया या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. चौकशीत गोड बोलून अनेकांना गंडा घालणारी ही एक आंतरराज्य टोळी आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मनी बावरियाविरुद्ध नवी दिल्लीतील नार्थ अव्हेन्यू आणि हॉज खास पोलीस ठाण्यात तीन तर प्रविणकुमारविरुद्ध अंधैरी पोलीस ठाण्यात एक गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांच्या अटकेने अशाच दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.