मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गेल्या १९ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीस अटक करण्यात ऍण्टॉप हिल पोलिसांना यश आले आहे. प्रकाश अनंत सुर्वे असे या ५७ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीला प्रकाश हा सतत गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्ध कुर्ला कोर्टाने स्टॅण्डींग वॉरंट जारी केले होते. त्याचा शोध सुरु असताना अखेर एकोणीस वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकाश सुर्वे हा सायन-कोळीवाडा, प्रतिक्षानगर चाळीत राहत होता. १९९२ साली त्याच्याविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात ३३६, ५०६ (२), ११४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच प्रकाश हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्ध कुर्ला येथील लोकल कोर्टाने स्टॅण्डींग वॉरंट जारी केले होते. या गुन्ह्यांत प्रकाश गेल्या १९ वर्षांपासून वॉण्टेड होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून ऍण्टॉप हिल पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. प्रकाशची स्थानिक रहिवाशांकडून माहिती काढत असताना या चाळीतील रहिवाशांना डोंगरीतील उमरखाडी परिसरातील ट्रान्झिंट रुममध्ये पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा डोंगरी परिसरात पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच दरम्यान त्याच्या काही नातेवाईकांची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या नातेवाईकाकडून मिळालेल्या माहितीवरुन प्रकाश हा एका बोटीवर काम करतो तसेच काही दिवसांसाठी तो त्याच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतो.
दिवाळी सणासाठी प्रकाश नातेवाईकाकडे येणार असल्याची माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांच्या विशेष पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी ८ नोव्हेंबरला प्रकाश उमरखाडीतील त्याच्या नातेवाईकाच्या घरी आला होता. यावेळी तिथे साध्या वेशात पाळत ठेवलेल्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो प्रकाश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला अटक करुन पुन्हा कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या १९ वर्षांपासून प्रकाश पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे, तडीपार अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरफात सिद्धीकी, पोलीस हवालदार महेश भोसले, निलेश चौधरी, गौरख सानप यांनी केली.
अन्य एका वॉण्टेड आरोपीस नऊ वर्षांनी अटक
अन्य एका वॉण्टेड आरोपीस नऊ वर्षांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. श्रीनाथ तानाजी शिंदे असे या आरोपीचे नाव असून जामिनावर बाहेर गेल्यानंतर तो गेल्या नऊ वर्षांपासून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रीनाथ हा सध्या नालासोपारा येथील ओस्वाल नगर, शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहत होता. २०१५ साली त्याच्याविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले होते. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहत असल्याने त्याच्याविरुद्घ अजामिनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते. त्याचा शोध सुरु केा होता. यावेळी त्याच्या वडिलांनी माहिती काढण्यात पोलिसांना यश आले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी श्रीनाथ हा गावातील लोकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण करत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला गावातील लोकांनी बाहेर काढले होते. याच दरम्यान श्रीनाथ हा ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक एदाळे, सलीम नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार सुरेश कडलग, गोपाळ तेली, पोलीस शिपाई बळवंत दळवी, गणेश सदवदे, महिला पोलीस शिपाई यादव यांनी नऊ वर्षांपासून फरार असलेल्या श्रीनाथ शिंदे याला ठाण्यातून शिताफीने अटक केली.