मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – विश्वासाने हॉटेलमध्ये भेटण्यसाठी आलेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने तिला ब्लॅकमेल करुन तिच्या वडिलांसह भावांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत मित्राला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पिडीत मुलगी धारावी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सचिन हा तिचा मित्र असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. २६ ऑगस्टला ती सचिनला ऍण्टॉप हिल, कोकरी आगार परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटली होती. तिथेच त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील व्हिडीओ काढले होते. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच त्याने तिला तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दोन दिवसांनी त्याने तिला पुन्हा हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिच्या वडिलांसह भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तो तिला सतत ब्लॅकमेल करुन तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता.
त्याच्या ब्लॅकमेलसह धमकीला कंटाळून तिने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सचिनविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास ऍण्टॉप हिल पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.