बेंचवर बसण्याच्या वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला
ऍण्टॉप हिल येथील शाळेतील घटनेने तणावाचे वातावरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – बेंचवर बसण्याच्या क्षुल्लक वादातून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच दोन वर्ग मित्रांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ऍण्टॉप हिल येथील एका खाजगी शाळेत घडली. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्यांला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले तर दुसर्या विद्यार्थ्यांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलिसांनी पंधरा वर्षांच्या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता ऍण्टॉप हिल येथील शाळेच्या चौथ्या मजल्यावरील एका वर्गात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. १५ वर्षांचा तक्रारदार मुलगा इम्रान हा वडाळा येथील करबला मशिदीजवळील भारतीय कमला नगरात राहतो. ऍण्टॉप हिल येथील एका खाजगी शाळेत तो दहावीत शिकतो. आयान हा त्याचा मित्र असून तो त्याच्याच वर्गात शिकतो. सोमवारी इम्रान आणि आयान हे नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत आले होते. यावेळी आयान आणि आदित्य या विद्यार्थ्यामध्ये बेंचवर बसण्याच्या जागेवर वाद झाला होता. यावेळी आदित्यने त्याचा मित्र शेखर याच्या मदतीने आयानसह इम्रानला शिवीगाळ करुन मारहाण केली होती.
काही वेळानंतर त्यांनी त्याच्याकडील चाकूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात इम्रानसह आयान हा जखमी झाला. आयानच्या पोटाला, पाठीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. वर्गात घडलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षकांनी लगेचच तिथे धाव घेतली होती. जखमी झालेल्या आयान आणि इम्रानला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. इम्रानला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले तर आयानची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर तिथे उपचार सुरु करण्यात आले. ही माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी इम्रानची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस येताच दोन्ही आरोपी मुलांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आदित्य आणि शेख या पंधरा वयोगटातील दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सोमवारी सकाळी शाळेत घडलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षकासह पालक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेची शाळेच्या प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषी दोन्ही विद्यार्थ्यांवर लवकरच कारवाई होणार आहे. या दोघांनाही शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.