मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२६
मुंबई, – एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करुन एका तरुणाच्या बँक खात्यावर डल्ला मारणार्या एका संशयित आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. नुमान नौशाद शेख असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या काही दिवसांत एपीके फाईल पाठवून अनेकांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नुमानच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
रोहित लालजी प्रजापती हा तरुण गोरेगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ५ सप्टेंबरला तो त्याच्या राहत्या घरी असताना त्याला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने त्याच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने कॉल करतो असे सांगून त्याने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने त्याला एक एपीके फाईल पाठविली होती. त्यामुळे त्याने ती फाईल ओपन केली. त्याच दरम्यान त्याचा मोबाईल हॅक झाला होता. त्याला त्याचा फोन वापरता येत नव्हता. दुसर्या दिवशी मोबाईल ऑन झाल्यानंतर त्याला त्याच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.
५ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्याच्या बँक खात्यातून सुमारे दोन लाख रुपये डेबीट झाले होते. त्यामुळे त्याने बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क साधून याबाबत माहिती दिली. यावेळी बँकेने त्याच्या बँक खात्यातून संबंधित फ्रॉड ऑनलाईन व्यवहार झाल्याचे सांगून त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. या प्रकारानंतर त्याने सायबर हेल्पलाईनसह गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा गोरेगाव पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत होते.
तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या नुमान शेख या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यासाठी त्याला सायबर ठगांनी काही ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिल्याचे उघडकीस आले आहे.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून ऑनलाईन फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.