घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

तीन देशी रिव्हॉल्व्हर-पिस्तूल व सात काडतुसे जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मार्च २०२४
मुंबई, – महालक्ष्मी आणि विलेपार्ले परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रवी मनोहर बागडी आणि रुनीत भागोजी खेडेकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील सहार रोड, जामा मशिदीजवळील लक्ष्मी फॉरेक्स कंपनीजवळ काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती युनिट आठच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, संग्राम पाटील, पोलीस शिपाई बिडवे तिथे साध्या वेशात पाळत ठेवून रवी बागडी याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत रवी हा मजुरीचे काम करत असून विलेपार्ले येथील सहार रोड, पीएनटी कॉलनीत राहतो.

अन्य एका रुनीत खेडेकर या तरुणाला पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. शनिवार ९ मार्चला महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या वरळीकडून येणार्‍या दक्षिण वाहिनीवरील डॉ. ई मोजेस रोड बसस्टॉपजवळ काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती युनिट दोनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जयेश कुलकर्णी, शीतल पाटील, पोलीस अंमलदार पाडवी, शिंदे, पाटील यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून रुनीत खेडेकर या २१ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक बॅग सापडली. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे सापडले. रुनीत हा नालासोपारा येथील वैती बंगल्याजवळी संतोष भुवन, गणेश कृपा चाळीत राहतो.

या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी ते रिव्हॉल्व्हर आणि पिस्तूल कोठून आणले, त्यांना ते कोणी दिले आणि ते कोणाला विक्रीसाठी आले होते, यापूर्वीही त्यांनी घातक शस्त्रांची विक्री केली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page