घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना अटक
मालवणी-विलेपार्ले येथे स्थानिक पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना मालवणी आणि विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. पूजा संदीप लोंढे ऊर्फ नगमा हनीफ शेख आणि महेश रामलखन गुप्ता ऊर्फ मटरु अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांनी ते पिस्तूल कोठून आणले, ते कोणाला विक्री करणार होते, यापूर्वीही त्यांनी घातक शस्त्रांची विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
विलेपार्ले येथे राहणार्या एका महिलेकडे घातक शस्त्रे असून या शस्त्रांची विक्रीसाठी ती विलेपार्ले येथील न्या. छगला मार्ग, संभाजीनगर परिसरात येणार असल्याची माहिती विलेपार्ले पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका बुवा यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मांडोळे, महिला पोलीस शिपाई चव्हाण, घोरपडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता तिथे एक महिला आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. चौकशीदरम्यान तिने ते पिस्तूल तिथे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. दुसर्या कारवाईत मालवणी पोलिसांनी महेश गुप्ता याला अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. महेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तीन दिवसांपूर्वी तो मालवणीतील राठोडी, गावदेवी मंदिराजवळ पिस्तूलची विक्रीसाठी आला होता, मात्र कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमोल येणारे, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई खांडवी, आमटे, पठाण यांनी त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना पिस्तूल आणि काडतुसे सापडली. या दोघांविरुद्ध नंतर आर्म्स ऍक्टतर्ंगत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवली आणि अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.