तीन विविध कारवाईत घातक शस्त्रांसह तिघांना अटक
खेरवाडी, अंधेरी-जे जे मार्ग पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – तीन विविध कारवाईत घातक शस्त्रांसह तिघांना खेरवाडी, अंधेरी आणि जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. सलीम रफिक शेख ऊर्फ शफीक शेख, ओमप्रकाश जगतनारायण विश्वकर्मा आणि जमिलू रेहमान हबीबू रेहमान खान अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जे. जे मार्ग पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक बाबूला टँक रोडजवळ गस्त घालत होते. यावेळी एक तरुण पोलिसांना पाहून पळून लागला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत त्याचे नाव ओमप्रकाश विश्वकर्मा असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या मौलाना शौकत अली रोड, निलगिरी हॉटेलजवळील परिसरात राहतो. तिथे तो गावठी कट्टा विक्रीसाठी आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. दुसर्या कारवाईत अंधेरी पोलिसांनी जमिलू खान याला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली. तो बिगारी कामगार असून मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. गेल्या आठवड्यात तो अंधेरी येथे घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होती. ही माहिती प्राप्त होताच अंधेरी पोलिसंनी त्याला अंधेरी येथून अटक केली होती. तिसर्या कारवाईत सलीम शेखला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. तो रत्नागिरीच्या दापोलीचा रहिवाशी असून सध्या वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले. सलीम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात तीन रॉबरीच्या गुन्ह्यांची ोंद आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. बुधवारी तो वांद्रे येथील स्वर्गद्वार मुस्लिम कब्रस्तानजवळ घातक शस्त्रे घेऊन आला होता, ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला गावठी कट्ट्यासह अटक केली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.