मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बिहारहून घातक शस्त्रे घेऊन आलेल्या एका मॉडेलला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. अभयकुमार उमेशकुमार चौरसिया असे या २४ वर्षांच्या मॉडेलचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चौदा काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वातंत्रदिन आणि बांगलादेशातील घडणार्या घडामोडीनंतर रेल्वे पोलिसांनी सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ केली होती. संशयित प्रत्येक व्यक्तीची तसेच त्यांच्या सामानाची झडती घेण्याचे आदेशच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, पोलीस उपनिरीक्षक धापसे, महाडिक, पोलीस हवालदार सकपाळ, सिद्धकी, माने, जाधव, मोरे, पोलीस शिपाई मोहिते, खराटे, खोटे, केदारे यांनी रेल्वे स्थानकात गस्त सुरु केली होती. शुक्रवारी गस्त घालणार्या पोलीस पथकाला बोरिवली रेल्वे स्थानकात एक तरुण संशयास्पदरीत्या जाताना दिसला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची तपासणी केली होती. यावेळी त्याच्या बॅगेतून पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चौदा काडतुसे सापडली. चौकशीत त्याचे अभयकुमार चौरसिया असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले.
अभयकुमार हा व्यवसायाने मॉडेल असून गेल्या काही महिन्यांपासून मिरारोड परिसरात राहतो. अभयकुमारने काही अभिनेता, मॉडेलसोबत काम केले असून त्याला बॉलीवूडमध्ये करिअर करायचे होते. काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या बिहारच्या गावी गेला होता. शुक्रवारी तो गावाहून बोरिवली रेल्वे स्थानकात आला होता. यावेळी त्याने बिहारहून पिस्तूल आणि काडतुसे आणली होती. त्याच्याकडे पिस्तूलबाबत कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते पिस्तूल कोणी दिले, या पिस्तूलचा तो वैयक्तिक कारणासाठी वापर करणार होता की त्याची विक्री करणार होता. त्याने यापूर्वीही बिहारहून शस्त्रे आणली होती. या पिस्तूलचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला होता की वापर होणार होता याचा पोलीस तपास करत आहेत.