सुरक्षारक्षकाची चोरीची गन व काडतुसे विक्रीचा प्रयत्न
वांद्रे येथे घातक शस्त्रे घेऊन आलेल्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सुरक्षारक्षकाची चोरीची गन आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. रुकशेद मेहबूब आलम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक गन आणि सोळा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्यांना सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना जास्तीत जास्त नाकाबंदी आणि गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांनतर शुक्रवारी वांद्रे पोलिसांचे विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. ही गस्त सुरु असताना काही तरुण वांद्रे येथील पटेलनगरी, बीएमसी आपला दवाखानाजवळ घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मराठे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमोडे, सहाय्यक फौजदार देवके, पोलीस हवालदार गायकवाड, चोपडे, चौगुले, अतुल अहिरे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री अकरा वाजता तथे रुकशेद हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना १२ बोअरचे एक गन आणि सोळा जिवंत काडतुसे सापडले.
या गन आणि काडतुसाबाबत चौकशी केली असता त्याने गेल्या आठवड्यात एका सुरक्षाक्षकाची ही गन आणि काडतुसे चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या या शस्त्रांची विक्रीसाठी तो तिथे आला होता, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत रुकशेद हा वांद्रे येथील बडी मशिदीजवळील कुरेशीनगर परिसरात राहत असून पेंटर म्हणून काम करतो. घातक शस्त्रे बाळगणे आणि त्याची विक्री केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.