मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह आरोपीस अटक
शस्त्रांची विक्री करुन ५० हजार रुपये मिळणार होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – मध्य प्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह एका ४१ वर्षांच्या आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. दिनेश लक्ष्मण कदम असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा राऊंड जप्त केले आहे. दोन्ही शस्त्रांची विक्री करुन त्याला ५० हजार रुपये मिळणार होते, पैशांसाठी त्याने ते शस्त्रे मध्यप्रदेशातून आणून मुंबईत विक्रीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
इतर राज्यातून शस्त्रांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण बोरिवलीतील आयसी कॉलजवळ घातक शस्त्रांची खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने बेारिवलीतील न्यू लिंक रोड, मंडपेश्वर मेट्रो स्टेशनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता तिथे दिनेश कदम आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत दिनेश हा साकिनाका येथील परेरावाडी, मोहिली गावचा रहिवाशी आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो मध्यप्रदेशात गेला होता. तेथील पाचोरा, भुरानुपर येथून त्याने एका व्यक्तीकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा राऊंड एक लाख सहा हजारामध्ये खरेदी केले होते. या दोन्ही पिस्तूलची तो मुंबईत दोन ते अडीच लाखांमध्ये विक्री करणार होता. त्यासाठी मंगळवारी दुपारी तो मंडपेश्वर मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ आला होता, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.