नागपूर येथून घातक शस्त्रे घेऊन आलेल्या तरुणाला अटक
दोन देशी बनावटीचे पिस्तूल, तीन राऊंड जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – नागपूर येथून घातक शस्त्रे घेऊन आलेल्या सोनू लिखानलाल भंडारी या २७ वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या अधिकार्यांनी अटक केली. सोनू हा मूळचा नागपूरचा रहिवाशी असून तो शस्त्रांची विक्रीसाठी मुंबईत आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, तीन राऊंड जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात इतर राज्यातून घातक शस्त्रांची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच नागपूर येथून काहीजण घातक शस्त्रे घेऊन आले असून या शस्त्रांची डिलीव्हरी सांताक्रुज परिसरात होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलस निरीक्षक उत्कर्ष वाझे, महेंद्र पाटील, भोसले, म्हाळसकर, शिंदे, गवते, चौगुले यांनी सांताक्रुज येथील टिळक रोड, वालिया चेंबर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंग्ळवारी तिथे सोनू भंडारी हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
सोनू हा नागपूरच्या हिंगाना रोड, एमआयडीसी पंचशीलनगर परिसरातील रहिवाशी आहे. तो नागपूर येथून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता. या शस्त्रांची त्याला विक्री करायची होती, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.