मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
ठाणे, – राजस्थानातून आणलेल्या घातक शस्त्रांसह सहवाग घनश्याम चतरावत या २२ वर्षांच्या तरुणाला नारपोली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन आणि तीन राऊंड जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घनश्याम हा शस्त्रांची विक्रीसाठी राजस्थानातून ठाण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
धामणकर काटा ते अंजुर फाटा परिसरात काहीजण घातक शस्त्रांची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस हवालदा सस्कर व अन्य पोलीस पथकाने अंजूर फाटाजवळील बांधकाम सुरु असलेल्या मेट्रो स्टेशन, विजय भजिया सेंटरसमोर साघ्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी तिथे सहवाग चतरावत हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्या अंगझडतीत पोलिसांना तीन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन, तीन राऊंड आणि एक मोाबईल सापडले.
चौकशीदरम्यान सहवाग हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. राजस्थान येथून तो ठाण्यात शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला होता. मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.