घातक शस्त्रांसह सांगलीच्या तरुणाला अटक
विदेशी पिस्तूलसह चार जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांसह नितेश भिमराव मोहिते या २५ वर्षांच्या सांगलीच्या तरुणाला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुर्ला येथे काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असलयाची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनावणे, पोलीस हवालदार धनाजी काशिद, सुनिल सोनावणे, पोलीस शिपाई खेमू राठोड यांनी कुर्ला येथील एलबीएस मार्ग, सीएनजी पेट्रोलपंपाजवळील संदीप बारसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी दुपारी तिथे नितेश मोहिते आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे सापडले.
चौकशीत नितेश हा काहीच कामधंदा करत नाही. सध्या तो सांगलीच्या वाळवा, वाटेगाव, आंबेडकर नगर स्टॅण्डजवळचा रहिवाशी आहे. मुंबईत घातक शस्त्रांना विशेषता विदेशी पिस्तूलला प्रचंड मागणी आणि पैसा मिळत असल्याने तो विदेशी पिस्तूलची विक्रीसाठी मुंबईत आला होता. मात्र पिस्तूलची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.