मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत एक वर्षांसाठी मुंबईसह ठाणे शहरातून तडीपार केलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला घातक शस्त्रासह दिडोंशी पोलिसांनी अटक केली. अरबाज जमीर खान ऊर्फ चिंकू असे या २५ वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. अरबाजविरुद्ध सतराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड येथील पुष्पा पार्क परिसरात काही रेकॉर्डवरील गुन्हेगार घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, सहाय्यक फौजदार रणशिवरे, पोलीस हवालदार नवनाथ बोराटे, चव्हाण, सांबरेकर, पोलीस शिपाई गायकवाड यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा पुष्पा पार्क बसस्टॉण्डजवळील मेट्रो पिलरजवळ अरबाज खान हा आला होता. तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले.
अरबाज हा गोरेगाव येथील संतोषनगर, बीएमसी कॉलनीत राहत असून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मारामारी, घातक शस्त्रे बाळगणे, चोरीच्या सरातहून गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या कारवायाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर त्याला नोव्हेंबर २०२४ एक वर्षांसाठी मुंबईसह ठाणे शहरातून तडीपार करण्यात आले होते. ही कारवाई सुरु असतानाही तो घातक शस्त्रे घेऊन मालाड परिसरात आला होता. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नांदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.