मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – वांद्रे परिसरात घातक शस्त्रे घेऊन आलेल्या सचिन रमाकांत सावंत या 47 वर्षांच्या आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि एक मोबाईल जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वांद्रे येथील गुरुनानक रोड, रत्नागिरी कोस्टल रेस्ट्रारंटजवळ काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती युनिट नऊच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुजीत म्हैसधुणे, पोलीस हवालदार दत्तात्रय कोळी, बाबासाहेब शेळके, पोलीस शिपाई अमोल सोनावणे, पोलीस हवालदार चालक शशिकांत निकम यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तिथे सचिन सावंत आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल सापडला. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी युनिट कार्यालयात आणण्यात आले होते. तपासात सचिन हा बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून तो वांद्रे येथे देशी पिस्तूलच्या विक्रीसाठी आला होता.
मात्र त्यापूर्वीच त्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.