घातक शस्त्रांसह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

मालाड येथे दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑगस्ट 2025
मुंबई, – घातक शस्त्रांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मालाड येथून अटक केली. महेश गोविंद ठाकूर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुस जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. महेश ठाकूर हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.

मालाड येथे काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती दहिसर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, पोलीस उपनिरीक्षक अजय सावंत, सहाय्यक फौजदार अल्ताफ खान, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, पोलीस हवालदार कल्पेश सावंत, संतोष राणे, विनोद अहिरे, संतोष बने, समृद्धी गोसावी, अनिल जाधव, अनंत मोरे, शैलेश बिचकर, विलास गोमे, नितीन पवार, विजय पवार, प्रसाद गोरुले, हरिश्चंद्र भोसले, गणेश शिंदे, महिला पोलीस हवालदार अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, अरुण धोत्रे, कैलास सावंत, विपुल ढाके यांनी मालाडच्या रेहजा टॉवर, इंडिया ब्रिजजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

सोमवारी सायंकाळी तिथे महेश ठाकूर आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुस सापडले. ते शस्त्रे ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेत आणण्यात आले.

अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. महेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहिसर, गुन्हे शाखा, गोरेगाव, आंबोली पोलीस ठाण्यात नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात पाच घरफोडीसह अपहरणासह लैगिंक अत्याचार, रॉबरीच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहिसर येथील दूध भेसळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
अन्य एका कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस व त्यांच्या पथकाने दहिसर येथील दूध भेसळीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यांत पोलिसांनी सैदुल नरसिंह कावेरी या 38 वर्षांच्या आरोपीस अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अमूल गोल्ड, अमूल ताजा, गोकुळ आणि नंदीनी ब्रॅडचे 488 लिटर भेसळयुक्त दूधासह संबंधित दूध कंपनीचे 1350 रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, भेसळीसाठी लागणारे उपकरणे, साहित्य, मोबाईल असा सुमारे 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दहिसर येथील एस. पी रोडच्या घरटनपाडा, मनुभाई चाळीत काहीजण दूधात भेसळयुक्त करुन भेसळयुक्त दूधाची विक्री करत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, पोलीस हवालदार शैलेश बिचकर, विलास गोमे, प्रसाद गोरुले, महिला पोलीस हवालदार अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ व एफडीआय पथकाने संयुक्तपणे तिथे छापा टाकून सैदुल कावेरी या आरोपीस अटक केली. घटनास्थळी तो दूधात भेसळ करताना रंगेहाथ सापडला होता. तेथून पोलिसांनी भेसळयुक्त दूधासह नामांकित दूध कंपन्यांच्या रिकाम्या पिशव्या, भेसळीसाठी लागणारे साहित्य आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला दहिसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page