मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
ठाणे, – घातक शस्त्रे घेऊन आलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस भिंवडी घटक दोनच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी शांतीनगर परिसरातून अटक केली. नफीस ऊर्फ तोतला दिलावर खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक माऊझर पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तोतला खान हा भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडे घातक शस्त्रे असून या शस्त्रांचा कुठल्या तरी गंभीर गुन्ह्यांत वापर होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस शिपाई इंगले यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार बोरसे, राणे, पाटील, घाग, महिला पोलीस हवालदार डोंगरे, पोलीस शिपाई इंगळे, घरत, कुंभार यांनी शांतीनगर, पाईपलाईनरोड येथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी तिथे तोतला खान आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक माऊझर पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याला ती शस्त्रे कोणी दिली, तो शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला होता का, ते शस्त्रे कोणाला देणार होता. या पिस्तूलचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का किंवा वापर होणार होता याचा पोलीस तपास करत आहेत.