घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक
तीन देशी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसांचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 डिसेंबर 2025
मुंबई, – पवईसह गिरगाव परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना पवई आणि व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद शब्बीर आसिफ सय्यद आणि प्रदीप संतोष सिंग अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल हस्तगत केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या घातक शस्त्रांचा विविध गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्रे विक्री करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पवई परिसरात काहीजण इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनतर पोलीस निरीक्षक बंडगर, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस शिपाई वारंग, शिरसाट, राठोड यांनी पवई लेक परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी रात्री उशिरा एक वाजता पवई लेक ओपन गार्डनजवळील मेजवानी हॉटेलच्या विरुद्ध दिशेने एक तरुण आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, सहा जिवंत काडतुसे, एक मोबाईल सापडला. तपासात त्याचे नाव प्रदीप सिंह असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा हरियाणाच्या गुरगावचा रहिवाशी आहे. हरियाणा येथून मुंबई शहरात तो घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या कारवाईपूर्वी व्ही. पी रोड पोलिसांच्या एका विशेष पथकाने गिरगाव येथून मोहम्मद शब्बीर या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. गिरगाव येथील एसव्हीपी रोड, अलंकार सिनेमासमोरील सूर्यवंशी गार्डनजवळ काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संकल्प मोकल, पोलीस हवालदार तोडणकर, जाधव, सचिन बरकडे यांनी सापळा लावून मोहम्मद शब्बीर या 55 वर्षांच्या आरोपीस ताब्यात घेतले होते.
तपासात तो मूळचा कर्नाटकच्या गुलबर्गाचा रहिवाशी असून सध्या पायधुनीतील मांडवी, मोहम्मद अली रोड, मांडवी पोस्ट ऑफिससमोरील फुटपाथवर राहतो. या दोन्ही आरोपीविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पवई आणि व्ही पी रोड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते घातक शस्त्रे कोणी दिले, ते कोणाला देणार होते. त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.