मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असताना संभाव्या गुन्ह्यांसाठी इतर राज्यातून घातक शस्त्रांची विक्रीचे प्रकार सुरुच आहे. अशाच दोन वेगवेगळ्या कारवाईत खार आणि शिवडी परिसरातून घातक शस्त्रांसह दोन तरुणांना गुन्हे शाखेसह शिवडी पोलिसांनी अटक केली. श्रीकृष्ण विवेंद्रपाल शर्मा आणि अब्दुल रेहमान हादिस शेख ऊर्फ बाबू टुंडा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी खार परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असून या शस्त्रांचा शहरात गंभीर गुन्ह्यांसाठी वापर होणार आहे अशी माहिती युनिट नऊचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी दया नायक व त्यांच्या पथकाने खार येथील चित्रकार धुंरधर रोड, पंजाब नॅशनल बॅकेसमोरुन साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या श्रीकृष्ण शर्मा याला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत श्रीकृष्ण हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बुंलदशहर, पालीचा रहिवाशी असून सध्या तो मिरारोड येथे राहतो. ही कारवाई ताजी असतानाच शिवडी येथून अब्दुल शेख याला शिवडी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली. अब्दुल हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या शिवडीतील दारुखाना परिसरात राहत होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तपासात तो तिथे गावठी कट्टा विक्रीसाठी आला होता. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांनी उत्तरप्रदेशातून ते शस्त्रे आणली होती. या शस्त्रांची विक्रीसाठी ते दोघेही खार आणि शिवडी परिसरात आले होते, मात्र त्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.