देशी पिस्तूल-गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – देशी पिस्तूल आणि गावठी कट्ट्यासह एका तडीपार आरोपीसह दोघांना कुरार आणि एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली. वाजिदअली इसरार मलिक ऊर्फ अमान मलिक आणि राजेश राजू पाटील अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, एक मॅगझीन आणि चार काडतुसे जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
तीन दिवसांपूर्वी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप लामतुरे, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई गावडे, हाक्के, हेमाडे आदी पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी बेलार्ड पिअरजवळील आर कमानी रोड, एसबीआय इमारतीजवळ एक तरुण संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसून आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक पिस्तूल, मॅगझीन आणि तीन काडतुसे सापडली. चौकशीदरम्यान त्याचे नाव राजेश पाटील असल्याचे उघडकीस आले. तो बेलार्ड पिअर परिसरात राहत असून हमालीचे काम करत होत. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तडीपार करण्यात आले होते. या कालावधीत त्याला मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे शहरात दोन वर्षांत बंदी घालण्यात आली होती. तरीही तो या आदेशाचे उल्लघंन करुन बेलार्डपिअर येथे घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता.
दुसर्या कारवाईत कुरार पोलिसांनी अमान मलिक याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक काडतुस जप्त केली आहै. अमान हा दहिसर येथील एस. व्ही रोड, तारी कंपाऊंडमध्ये राहतो. बुधवारी तो मालाड येथील कुरार गाव, पारेखनगर गार्डनजवळ गावठी कट्ट्याची विक्रीसाठी आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी ते शस्त्रे कोठून आणली आणि ती कोणाला विक्री करणार होते याचा पोलीस तपास करत आहेत.