घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या आरोपीस अटक
गुन्हे शाखेची कारवाई; दोन पिस्तूलसह काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या एका ३५ वर्षांच्या आरोपीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने वांद्रे येथून अटक केली. मनोज गोपाळ गॅलीपेल्ली असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दहा राऊंड आणि एक मोबाईल जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी मनोजविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात विक्री केली जात होती. या शस्त्रांचा गंभीर गुन्ह्यांत वापर होत असल्याने त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला अशा आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अशा आरोपींविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण वांद्रे परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने वांद्रे येथील महाराष्ट्रनगर, बीएमसी बाळासाहेब ठाकरे अपना दवाखान्याजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी तिथे मनोज आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी पळून जाण्याची कुठलीही संधी न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल जप्त केले आहे.
चौकशीत त्याने तो तिथे शस्त्रांची विक्रीसाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध ३, २५ शस्त्र कायदा सहकलम ३७ (१), (ए) एमपी कायदा सहकलम १३५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. तपासात जॉन हा घाटकोपर येथील मुंकूदराव आंबेडकर नगर, सहकार चाळ समिती, शारदा फ्लोअर मिलचा रहिवाशी आहे. त्याला ते शस्त्रे कोणी दिले होते, ते शस्त्रे कोणाला विक्री करणार होता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.