मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांसह एका रेकॉर्डवरील आरोपीसह दोघांना कांजूरमार्ग आणि ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. आदित्य शाम पारखे ऊर्फ मिट्टू आणि इम्रान यासीन खान ऊर्फ इनामदार ऊर्फ लोच्या अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसांसह इतर मुद्देमाल हस्तगत केले आहे. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसांपूर्वी ट्रॉम्बे पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी अभिलेखावरील गुन्हेगार असलेला आदित्य पारखे हा संशयास्पररीत्या फिरताना पोलिसांना दिसला. त्याला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पोलिसांना पाहताच पळू लागला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन आदित्यला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. तपासात आदित्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात बाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बाबशेट्टी, प्रभारी पोलीस निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश धुमाळ, पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस शिपाई देशमुख यांनी केली.
दुसर्या कारवाईत इम्रान खान याला कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, एक मोबाईल, दोन सिमकार्ड आणि आधारकार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. इम्रान हा भांडुप येथील भवानीनगर, मासेकोळी वसाहतीच्या एका भाड्याच्या रुममध्ये राहत होता. त्याच्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, महिला पोलीस हवालदार तिरोडकर, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, पवार जोशी, शिरापुरी, कांबळे, पोलीस शिपाई पिंजारी, राठोड यांनी तिथे छापा टाकून ही कारवाई केली होती. या दोघांना ते शस्त्रे कोणी दिले, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला होता का किंवा वापर होणार होता याचा पोलीस तपास करत आहेत.